Press "Enter" to skip to content

सरकारी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे

admin 0

सरकारकडून जनकल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात असतात. मात्र, या योजनांची माहिती तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहचतेच असे नाही. विविध योजनांच्या माहितीच्या अभावामुळे जसे की, पात्रतेचे निकष, अर्ज कुठे व कसा करावा इत्यादी माहिती नीट आणि वेळेवर मिळाली नाही तर बरेचदा लाभार्थी त्या योजनांपासून वंचित राहू शकतात. आपल्या असलेल्या उद्योग, व्यवसाय इत्यादींसंबधी शासनाच्या कोण-कोणत्या योजना आहेत याची नागरिकांना माहितीही नसते.

याप्रकारे जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारकडून ‘महालाभार्थी’ नावाची वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाइटवर नाव आणि इतर माहितीची नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपल्या उद्योग, व्यवसाय, शिक्षण इत्यादीनुसार शासन दरबारी उपलब्द असलेल्या योजनांची माहिती मिळणार आहे.

‘महालाभार्थी’ सेवांसाठी www.mahalabharthi.in ह्या वेब पोर्टलवर नागरिकांनी भेट द्यावी. ‘महालाभार्थी’ ही सुविधा मोबाईल अ‍ॅप द्वारे सुद्धा उपलब्ध झालेली आहे. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर जाऊन MahaLabharthi हे अ‍ॅप डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता येते.

नोंदणी प्रक्रियाः

नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. नागरिकांनी आपला मोबाईल क्रमांक, संपूर्ण नाव, जन्मदिनांक, इ-मेल आयडी ही माहिती भरून नोंदणी करावी. यशस्वीरीत्या नोंदणी झाल्यावर नागरिकांना नोंदणीकृत मोबाईलवर तसा संदेश येतो. त्यामध्ये त्यांचा 12 अंकी लॉगीन आयडी दिलेला असेल. हा लॉगीन आयडी आणि तयार केलेला पासवर्ड पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे.

यशस्वी नोंदणीनंतर नागरिकांना पोर्टलवर मी कोण असे दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही पर्याय चित्ररूपात दाखविले जातात, जसे की, शेतकरी, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, इत्यादी. येथे नागरिक एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकतात. त्या भूमिकांच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची आणि त्यामध्ये मिळणार्‍या लाभांचीसुद्धा माहिती चित्रमय स्वरूपात पोर्टलवर दिली जाते.

पोर्टलवर माझे लाभ यावर क्लिक केले असता निवडलेल्या भूमिकांनुसार विविध योजना त्यांच्या विभागाप्रमाणे आपल्याला दिसतात. प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला काय लाभ मिळू शकतील हे लिहिलेले आहे. त्याच्या चित्रावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित योजनेचा थोडक्यात तपशीलही मिळतो.

नोंदणी केल्यानंतर मिळणारी माहिती 
1. आपण पात्र होऊ शकणार्‍या योजनांची यादी
2. संबंधित योजनांमध्ये मिळू शकणारे लाभ
3. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
4. अर्ज स्विकृती कार्यालय / अधिकारी संपर्क
5. योजनांसंबंधित उपलब्ध शासन निर्णय (जीआर)
6. अर्ज नमुना उपलब्ध असल्यास

-रमेश पाटील

source:www.pudhari.news/news/Kolhapur/Mahalabharthi-website-for-government-schemes/

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *